कदमवाकवस्ती येथील महायुती पक्षाच्या अजित पवार यांच्या सभेला आणली भाड्याची लोकं..!
लोकपसंद न्यूज : विशेष प्रतिनिधी, हवेली
कदमवाकवस्ती, हवेली : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीमध्ये महायुती पक्षाचे नेते आपला आपला उमेदवार निवडून येण्यासाठी विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा घेताना दिसत आहेत.
याच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचे महायुती पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ दि.७ मे (मंगळवार) २०२४ रोजी पूर्व हवेलीतील कदम वाक वस्ती या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते, याच सभेला गर्दी जमवण्यासाठी भाड्याने लोक आणल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्या व्हिडिओमध्ये ते लोक असे सांगतात की,
आम्ही टाक्याचा मळा या ठिकाणाहून ८० लोक आलो होतो, आम्हाला प्रत्येकी ३०० रुपये दिले, त्यातील आमचे १५ लोक राहिले असून यांचे पैसे कोण देणार ? अशी त्या लोकांमध्ये चर्चा चालली असल्याचे व्हिडिओ फुटेज मध्ये दिसून येत आहे.
या संपूर्ण घटनेबाबत शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले मला या कोणत्या गोष्टीची कल्पना नाही.